

चाकूर : वडिलाने घरातील गॅस भरण्यासाठी पैसे दिले परंतू, पोलीस भरतीच्या फीससाठी मला पैसे ठेवले नाहीत, असे म्हणत निर्दयी मुलाने जन्मदात्या बापाचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१६) पहाटे तीनच्या सुमारास चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथे घडली. देविदास काशीनाथ पांचाळ (वय ७०) असे खून बापाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजय देविदास पांचाळ (वय २४) याला अटक केली असून या घटनेने हिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील हिंपळनेर येथील अजय पांचाळ याने वडिलांना पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे मागितले होते. यावेळी त्यांनी आता पैसे नसल्याचे मुलाला सांगितले. त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे न देता तुम्ही गँस भरून का घेतलात? असे म्हणत रागाच्या भरात वडिलांना हातातील लाकडाने जबर मारहाण केली. यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आई शारदाबाई देविदास पांचाळ (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली. दरम्यान न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून नमुने घेतले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी.एन.चामले हे करीत आहेत.