

लातूर : लातूर जिल्ह्यातील रस्ते अपघातात गाडी चालवताना हेल्मेट न वापरल्यामुळे व कारमध्ये असताना सीट बेल्टचा वापर न केल्यामुळे शेकडो जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जीवन हे अमुल्य असून त्याची भरपाई कशातही होऊ शकत नाही हे वास्तव ओळखून वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात 2025 मध्ये एकूण 849 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये 384 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 560 जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. यापैकी दुचाकी वाहनांचे 297 अपघात झाले असून 240 जणांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमिवर लातूर पोलीस दलाने केलेल्या शास्त्रोक्त विश्षेलनातून प्रामुख्याने चारचाकी वाहन चालवत असताना वाहन चालकाने आणि सहप्रवाशाने सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे आणि दुचाकी वाहन चालक आणि सहप्रवासी यांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे गंभीर किंवा प्राणांतिक अपघात झाल्याचे लातूर निदर्शनास आलेले आहे.
हीच गंभीर व प्राणांतिक अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.यामुळे सर्व नागरिकांनी वाहन चालविताना सीटबेल्ट व हेल्मेटचा नियमित वापर करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
सीट बेल्ट ठरला जीवन रक्षक हा घ्या पुरावा
29 मे रोजी बोरफळ येथे कारचा भीषण अपघात झाला होता. कारने दोन वेळा पलटी घेतली होती कारमध्ये प्रवासी व कारचालकाने सीट बेल्ट लावले होते. परिणामी असा अपघात होऊनही किरकोळ दुखापत वगळता कसलीही जीवितहानी झाली नाही.
प्राणाचे मोल कशातही करता येत नाही. गेलेला प्राण परत आणता येत नाही. माणूस गेला तर त्याच्यावरील अवलंबीतावर आभाळ कोसळते, अनेक प्रश्न उभे ठाकतात मात्र दुचाकीवर असताना हेल्मेट तर कारमध्ये असताना सीट बेल्ट वापरुन वाहतुकीचे नियम पाळून आपण आपल्या जीवाचे रक्षण करू शकतो. आपल्या कुटुंबाचा आनंद व आधार भक्कम ठेवू शकतो. त्यामुळे हेल्मेट, सीटबेल्ट वापरा सुरक्षित रहा.
अमोल तांबे, पोलिस अधीक्षक