

चाकूर: तालुक्यातील शिवणखेड बु. येथील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीसाठी कोल्हापूरकडे घेऊन जाणारी खाजगी बस मंगळवेड्याजवळ आज (दि.२६) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान उलटली. बसमधील ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले आहेत. त्या बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांना लातूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सध्यस्थितीत विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून ते सुखरूप असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिली आहे.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड बु. येथील श्री गणेश विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना ज्यामध्ये १८ मुली आणि २१ मुलांना घेऊन अभ्यास सहलीसाठी एका खाजगी बसने कोल्हापूर येथील पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक स्थळे पाहण्यासाठी रात्री १० च्या सुमारास निघाली होती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्याजवळ चालक मोबाईलमध्ये बघत असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाली. अपघातात बसमधील काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांना किरकोळ मार लागून ते जखमी झाले. देव बलवत्तर म्हणून कुठलीच जीवितहानी झाली नाही. जखमी विद्यार्थ्यांना मंगळवेड्याहून लातूर येथे आणण्यात आले आहे. किरकोळ जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्याध्यापक कलमे यांच्याशी संवाद साधला असता ही सहल शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने काढली होती. कोल्हापूर येथील पर्यटन व शैक्षणिक स्थळे पाहण्याचे ठरवले होते. परंतु रस्त्यात हा अपघात झाला आहे. जीवितहानी झालेली नाही. काही विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. तत्काळ त्यांना दुसऱ्या गाडीने परत लातूरला आणून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे त्यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.