

देवणी: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इस्मालवाडी येथील एका ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन गुरुवारी (दि. १९) आत्महत्या केली. सोमेश्वर खंडू मुगळे (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सोयाबीनचे घटलेले बाजारभाव, गेल्या तीन वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती, सततची नापिकी, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, खर्च अन् उत्पन्नाचा न बसत असलेला मेळ, कर्जाचे वाढत चाललेले चक्र यामुळे इस्मालवाडी गावातील तरुण व उमद्या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दोन एकर शेतीत कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा. अन् तीन लेकरांचे शिक्षण त्यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या या विवंचनेतून दोन दिवसांपूर्वी ते घरातून निघून गेले होते.
कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. गुरुवारी भांतब्रा (ता. भालकी, जि. बिदर) येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पार्थिवाचे भालकी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. भालकी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे.