

लातूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, कोणत्याही अनुचित प्रकारास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करण्यासाठी लातूर पोलिस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्याच्या उद्देशाने आज 11 जानेवारी रोजी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी 13.5 वाजता पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली. या तालीममध्ये गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी व विवेकानंद चौक पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, 10 दुय्यम अधिकारी, 53 पोलिस अंमलदार तसेच 1 आरसीपी प्लाटून सहभागी झाले.
या रंगीत तालीमदरम्यान दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, जमाव कसा नियंत्रित करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदेशीर मार्गाने परिस्थिती कशी हाताळावी, तसेच विविध विभागांमधील समन्वय कसा साधावा याचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहे.
दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 14.20 ते 14.45 या वेळेत गंजगोलाई ते सुभाष चौक, अंबिका मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे पोलिस स्टेशन गांधी चौक असा रूट मार्च घेण्यात आला. हा रूट मार्च केवळ पोलिस दलाच्या तयारीचे प्रदर्शन नसून, तो समाजातील प्रत्येक घटकासाठी एक सकारात्मक संदेश होता.
निवडणुकीदरम्यान शांतता, सौहार्द व सामाजिक सलोखा राखावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्वरित पोलिस प्रशासनास कळवावे. मतदानाचा हक्क निर्भय वातावरणात बजावण्यासाठी पोलिस दल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आवाहन लातूर पोलिस प्रशासनाने केले आहे.