

निलंगा :-निलंगा तालुक्यात 14 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे निलंगा तालुक्यातील निलंगा औराद शहाजानी, तांबरवाडी, हालसी, होसूर चिंचोडी, निटूर, बसपुर, शिरोळ वा, केळगाव या गावातील शेतकऱ्याच्या शेती पिकाची अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, मूग,उडीद हे पीक भुईसपाट झाले असून मुगाच्या शेंगाला कोंब फुटले आहेत. यामुळे हजारो हेक्टरी पिके हातचे निघून गेले असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना हा शेतकऱ्याला नेहमीच करावा लागत आहे यावर्षी खरिपाचे पीक सोयाबीन, उडीद, तूर, मूग हे चांगले डोलत होते. मात्र मागील चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे काढणीला आलेल्या मूगाच्या शेंगांना जागेवर कोंब फुटून उगवले आहे.
तर इतर पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. महसूल विभागामार्फत तहसीलदाराने शेतकऱ्याच्या शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणता अधिकारी हा शेतकऱ्याच्या बांधावर यायला तयार नाही. निलंगा चे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी सहज जाता जाता ते मांजरा नदीवरील ढोबळेवाडी-उजेड पुलावर येऊन पुलावरूनच शेतीची पाहणी केली व निघून गेले.
ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन सुद्धा प्रशासनाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत यामुळे शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी येऊन शेती पिकाचे पाहणी करावी व शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.