

लातूर : निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरात हणुमंतवाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगा शेत शिवारातून सोयाबीन चोरून नेणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून वाहनासह 40 कट्टे सोयाबीन जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 11 जानेवारी रोजी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने 11 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निलंगा पोलिस स्टेशन हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरात हणुमंतवाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगा शेत शिवारात 4 ते 5 इसम चोरट्या पद्धतीने, संशयितरीत्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाठलाग करून तीन इसमांना ताब्यात घेतले. एक इसम पिकअप वाहन घेऊन पसार झाला. ताब्यात घेतलेल्यांमध्ये दीपक तानाजी पवार (वय 27), नवनाथ छगन ऊर्फ अचित काळे (वय 25), संतोष सखाराम काळे (वय 23, सर्व रा. गोरोबा गल्ली, तेर, ता. जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.
या कारवाईत सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली (एम एच 25 ए व्ही 4427) स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1 लाख 38 हजार 400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पसार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि सदानंद भुजबळ, पोउपनि राजेश घाडगे, पोलिस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापटटे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरूरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांचा समावेश होता.
शिंदी जवळगा येथून चोरले होते सोयाबीन
15 दिवसांपूर्वी खरोसाजवळील शिंदी जवळगा गावातील शेतशिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तोच चोरीचा माल लपवून ठेवला होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. आज ते सोयाबीन पिकअप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना आरोपी पकडले गेले.