

Hangarga Gram Panchayat worker death
निलंगा : तालुक्यातील हंगरगा येथील ग्रामपंचायच्या सेवकाचा नाल्यातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी घडली आहे. बालाजी माधव जाधव (वय 29) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील हंगरगा ग्रामपंचायत चा सेवक बालाजी जाधव हे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गावातील ओढ्यावर असलेली पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह वाढला होता. तो त्या सेवकाच्या लक्षात आला नाही. तेथील ओढ्याच्या बाजूला असलेल्या नाल्यातील खड्ड्यात पडला त्याला पोहायला येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाला आपला जोडीदार अजून कसा काय आला नाही म्हणून ते पाहण्यासाठी दुसरा जोडीदार सेवक व ग्रामसेवक हे त्याला शोधण्यासाठी गेले असता सदरील सेवक हे वाहून जाऊन मृता अवस्थेत पुढे तरंगत गेला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदरील घटनेची माहिती पोलिसांना गावकऱ्यांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह औराद शहाजणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. बालाजी जाधव याच्या घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सहा महिन्याचा मुलगा, आई-वडील असा परिवर आहे.