

Latur News: District administration on alert mode for citizens of the district stranded in the Middle East
लातूर, पुढारी वृतसेवा : मध्यपूर्वेत अमेरीका - इस्त्राईल व इराण यांच्यात सुरू असलेल्या युध्दामुळे तेथील विमानसेवा ठप्प झाली असून अनेक भारतीय तेथे अडकले आहेत. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारच्या विविध दुतावासांनी संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक व इमेल जारी केले असून लातूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील नागरीकांना संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील रहिवाशी अथवा नागरीक उपरोक्त देशांत अडकले असल्यास (०२३८२-२२०२०४) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रातील बरेच नागरीक व्यवसाय, काम, नौकरीसाठी आखाती देशात वास्तव्यास आहेत, लातूर जिल्ह्यातील नागरीकांचाही त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे अलिकडे दुबई सारख्या शहरात पर्यटनासाठी पसंती मिळत असून दरवर्षी मोठ्या संख्येत लातूरकरही या पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
तेथील छायाचित्रे व्हीडीओज समाजमाध्यमांवर टाकत आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या विविध दुतावासांनी संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक व इमेल जारी केले असून महत्वाच्या सुचना करीत त्या पालन करण्याचे आवाहनही केले आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या पार्श्वभूमिवर लातूर नियंत्रणकक्षात संपर्कासाठी (०२३८२-२२०२०४) हा दुरध्नी क्रमांक चोवीस तासासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
जिल्ह्यातील रहिवाशी अथवा नागरीक उपरोक्त देशांत अडकले असल्यास दिलेलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागही याकामी सतर्क असून मिळणारी माहिती संकलीत करण्यात येत असल्याचे लातुरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेतलेल्या या समयसुचक निर्णयामुळे व जारी केलेल्या या दुरध्वनी क्रमांकामुळे जिल्ह्यातील तेथे असलेल्या नागरीकांची माहिती संकलीत करण्यास सुलभता लाभणार आहे.
नातेवाइकांना चिंता
सध्या पवित्र रमजान सुरू असून मक्का येथे जिल्ह्यातील सुमारे दीडशे यात्रेकरून गेल्याची चर्चा आहे. यातील बरेच यात्रेकरू हे पूर्ण रमजान कालावधीत तेथे वास्तव्यास असतात तर काहीं आठ- दहा दिवस या पवित्रस्थळी मुक्काम करुन परतात. मक्का येथे या युध्दाचा सध्या थेट परिणाम नसला तरी मध्यपूर्वेतील वर्तमान युध्दजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी त्यांच्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. या युध्दाचे पुढे काय होईल? ते केंव्हा थांबेल ? कोणत्या थराला जाईल, कोणते वळण घेईल?, हे प्रश्न निरुत्तरीत असल्याने संबधीतांच्या नातेवाईकांस चिंता लागली आहे.