

लातूर : शहर महापालिकेसाठी गुरुवारी सुमारे 64 टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून रात्री उशिरापर्यंत निश्चित आकडा कळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून येथील महिला तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. निकालांबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी मतदानास फारसा प्रतिसाद दिसून आला नाही . साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी 7.3 तर साडेअकरा वाजेपर्यंत 18.22 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर हा वेग काहींसा वाढला. दुपारी साडेतीनपर्यंत 43.58 टक्के मतदान झाले. ददुपारनंतर गावभागात मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे गावभागात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती.
दरम्यान सांयकाळी अनेक मतदार रांगेत असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास रात्री उशीर होणार होता. सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील मतदानाचा लेखी अहवाल जमा केल्यानंतरच अंतिम आकडेवारी दिली जाते. त्यामुळे सर्व मतदान पथके स्ट्राँग रुम येथे आल्यानंतरच हा अहवाल मिळणार आहे. असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे, 16 जानेवारी रोजी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या करिता स्वतंत्र मतमोजणी कक्ष उभारण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसाठी मतमोजणी पाहणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मोजनीसाठी 10 टेबल असतील. निवडणुक निर्णय अधिकारी हे एका वेळी एक प्रभागाची मोजणी करतील मतमोजणीचा ठिकाणी मिडिया कक्षाची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी प्रिन्ट मिडिया व इलेक्ट्रोनिक मिडिया यांचे प्रतिनिधी यांना निवडणुकीचा निकालाची माहिती देण्यात येणार आहे मतमोजणीसाठी 445 एवढे मनुष्यबळ असेल. मतमोजणी ही दोन किंवा तीन राऊंड मध्ये होणार असल्याचे संबधीत विभागाने सांगितले.
लातूर महानगरपालिकेसाठी नोंद असलेल्या तीन लाख 21 हजार 354 मतदारांपैकी तीन ते चार हजार दुबार मतदार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र आज झालेल्या मनपा निवडणुकीत दुबार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. कारण कालच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून बहुतांश मतदार हे लातूर शहरालगतच्या वस्तीत व गावांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात राहतात. त्यांचे मतदान ग्रामपंचायत हद्दीतही आहे आणि महापालिका हद्दीतही आहे. दुबार नोंदीचा फटका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून अनेकांनी महापालिकेसाठी मतदानाकडे पाठ फिरविली असल्याचे समजते.