

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 759 उमेदवारी अर्जांपैकी 132 अर्ज छाननीतच बाद झाले आहेत, तर 627 अर्ज वैध ठरले आहेत. छाननीच्या दिवशी बुधवारी एकूण 15 प्रभागांमधील उमेदवारी अर्जांची छाननी झाली होती. प्रभाग 1, 2 व 3 मधील काही उमेदवारी अर्जांवर आक्षेप आले होते. त्यांची सुनावणी गुरुवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे झाली. त्यानंतर छाननी अहवाल जाहीर करण्यात आला.
लातूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी स्वबळाचा नारा देत राजकीय आखाड्यात आपापले खिलाडी उतरविले आहेत. महापालिकेच्या एकूण 18 प्रभागांतील 70 जागांसाठी 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत एकूण 759 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात आली.
मात्र प्रभाग एक, दोन व तीनमध्ये आक्षेप आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवली व सकाळी अकरा वाजता सुनावणी पूर्ण करून छाननी पूर्ण करण्यात आली. उमेदवारी अर्ज व्यवस्थित न भरणे, अपूर्ण माहिती, सूचक व अनुमोदक यांच्या त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता, विरोधकांनी घेतलेले आक्षेप अशा विविध कारणामुळे 132 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर 627 उमेदवारी अर्ज वैध ठरले.
भाजपकडे 59, काँग्रेसकडे 56 नवे चेहरे
महापालिका निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाने काही विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे तर जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांनाही पुढे आणले आहे. भाजप 70 जागा लढवत असून पैकी 11 विद्यमान नगरसेवक व 59 नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. काँग्रेसने 65 जागांवर उमेदवार दिले आहेत तर वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देऊन युती केली आहे. 65 पैकी 9 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा मैदानात आणली असून 56 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नव्हे चार दिवसाचा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रभागनिहाय वैध उमेदवारी अर्जांची संख्या
प्रभाग 1 मध्ये 43, प्रभाग 2 मध्ये 46, प्रभाग 3 मध्ये 58, प्रभाग 4 मध्ये 35, प्रभाग 5 मध्ये 27, प्रभाग 6 मध्ये 35, प्रभाग 7 मध्ये 28, प्रभाग 8 मध्ये 32, प्रभाग 9 मध्ये 29, प्रभाग 10 मध्ये 27, प्रभाग 11 मध्ये 27, प्रभाग 12 मध्ये 29, प्रभाग 13 मध्ये 37, प्रभाग 14 मध्ये 46, प्रभाग 15 मध्ये 43, प्रभाग 16 मध्ये 44, प्रभाग 17 मध्ये 19, प्रभाग 18 मध्ये 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
काँग्रेसची या उमेदवारांना पुन्हा संधी
काँग्रेसने 2017 मधील 9 उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. प्रभाग 2 मध्ये सचिन बंडापल्ले, प्रभाग 3 मध्ये विजयकुमार साबदे, प्रभाग 4 मध्ये गौरीबी बागवान, अहमदखान पठाण, प्रभाग 7 मध्ये युनूस मोमीन, प्रभाग 9 मध्ये सपना किसवे, प्रभाग 10 मध्ये कांचन अजनीकर व माजी महापौर ॲड. दीपक सूळ, प्रभाग 13 मध्ये माजी सभापती बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजप या नगरसेवकांवर पुन्हा मेहरबान
भाजपने प्रभाग 1 मध्ये माजी उपमहापौर देविदास काळे, प्रभाग 6 मध्ये ज्योती आवसकर, प्रभाग 8 मधून माजी सभापती ॲड. शैलेश गोजमगुंडे (पूर्वी प्रभाग 1 मध्ये होते) व शैलेश स्वामी, प्रभाग 12 मध्ये रागिनी यादव, डॉ. दीपा गीते व ॲड. गणेश गोमचाळे (गणेश गोमचाळे यांच्या प्रभाग 12 मध्ये मातोश्री शशिकला गोमचाळे नगरसेविका होत्या) प्रभाग 14 मध्ये स्वाती घोरपडे, प्रभाग 15 मध्ये ॲड. दीपक मठपती, प्रभाग 17 मध्ये शोभा पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.