

बीड : बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासीयांना केले. यावेळी अजित पवार यांच्या गतिमान कारभाराचा अनुभवही बीडकरांना आला, नाट्यगृहासाठी निधीच्या मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर विमानात बसलेले असताना अजित पवार यांनी सही केली, यानंतर तातडीने सूत्रे हलवत अजित पवार हे विमानतळावर उतरेपर्यंत आठ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पवारांनी सांगितले.
बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जिल्ह्यातील 1363 विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचे भूमिपूजन, टेनिस कोर्टाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘दिवाळी नवीन घरात’ उपक्रमाचा समारोप, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, ध्वज निधी संकलनात बीड जिल्हा राज्यात प्रथम आल्याने सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळाही या एकाच ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवत उपस्थित होते. श्री.पवार म्हणाले, नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. येत्या नववर्षात आपणास बीडच्या विकासात अधिक भर घालायची आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच 1363 विकासकामांनी सुरुवात झाली आहे, ही आनंदाची बाब आहे.
बीड जिल्ह्यात एकाच वेळेस एवढ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होत आहेत, त्यामध्ये आपणा सर्वांची साथ असल्याचेही ते म्हणाले.जिल्हा परिषद, जिल्हा सैनिक कार्यालय व इतर कार्यालयांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम होत आहे. त्याला जनतेचीही साथ आहे, त्यामुळे येथील जनतेला जनतेला धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले. यासह त्यांनी जिल्ह्यात देण्यात आलेल्या भरीव निधीबाबत सविस्तर माहिती दिली.
यामध्ये त्यांनी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी निधीसह शासन मान्यता दिल्याचे आवर्जून सांगितले. बीड-परळी रेल्वे, भूसंपादनाची आवश्यकता, रेल्वेचे इलेक्ट्रीफिकेशन, ऊसतोड कामगारांसाठी उर्वरित पाच तालुक्यात वसतिगृहे, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा बृहत आराखडा, सीट्रीपल आयटी, आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी नियोजन, रेशीम उत्पादन भरभराटीसाठी सिल्क पार्क, विज्ञान उद्यान, तारांगण पार्क, पुरातन वास्तूंचे जतन, बीडसाठी दरदिवसाला पाणी मिळावे यासाठीचे नियोजन आदी बाबींवरही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वनाने व, राष्ट्रगीत, राज्यगीताने झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. आभार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी मानले.
सहकार मंत्री पाटील म्हणाले, केंद्र, राज्यपातळीवरील सहकार विभागाचे काम उत्तम आहे. राज्याने सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे, या सहकाराच्या माध्यमातून राज्याची ओळख जगभर आहे. येणाऱ्या काळामध्ये तरुणांच्या हाताला काम, महिलांचे सक्षमीकरण सहकार क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात करण्यात येणार आहे. सहकारी चळवळीला अधिक गतिमान करण्यावर शासनाचा भर आहे. बीड जिल्ह्यामध्ये सहकार भवनाची आवश्यकता होती, म्हणून 14 कोटी 98 लाख एवढ्या रकमेचे सहकार संकुल याठिकाणी उभे राहत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगत सहकार विभागाशी संबंधित 10 कार्यालये एकाच ठिकाणी या संकुलामध्ये राहतील. त्यामुळे नागरिकांची सोय होणार असल्याचेही ते म्हणाले.