

Latur makes its mark among the 'Top 5' District Collector offices
लातूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत करण्यात आलेल्या अंतिम मूल्यांकनानुसार, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील पाच सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्थान मिळाले असून यामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रम यानिमित्ताने राज्यस्तरावर झळकले आहेत.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या या सुधारणा कार्यक्रमाचा उद्देश प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवणे होता. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने याउपक्रमाची अंमलबजावणी १ जून २०२५ पासून सुरू केली होती. विविध उपक्रमांसाठी लातूर प्रशासनाने संकेतस्थळ सुधारणा, ई-ऑफिस प्रणाली, व्हाटसअप चॅटवॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जीआयएस व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर २३ भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून दिली गेली आहे. तसेच विविध महत्वाची संकेतस्थळे, समाज माध्यमे या संकेतस्थळाला जोडण्यात आली. नागरिकांना तक्रार व अभिप्राय देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, हे संकेतस्थळ मोबाईलवर सहज वापरता यावे, यादृष्टीने रचना करण्यात आली. नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणारी रचना व माहिती यामुळे आतापर्यंत ५ लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.
सेवायोजना कायद्यानुसार ४ लाख ९२ हजार अजपिकी ९७.९३% अर्जाचा वेळेत निपटारा करण्यात आल्यामुळे नागरिकांना जलद सेवा मिळाली आहे. ई ऑफिस प्रणालीद्वारे ७२ हजार ६७१ ई फाईल्स तयार करण्यात आल्या व एकूण ७६ हजार ८७८ ई-फाईल निकाली काढण्यात आल्या आहेत, डॅशबोर्ड निर्णयप्रणालीमुळे कामकाजाचा ऑनलाईन आढावा घेणे शक्य झाले आहे. सर्व कार्यालयीन कामकाजाच्या प्रक्रियेची गतिमानता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हॉट्सअॅप चॅटलॉटचा वापर करण्यात आला आहे.
यामुळे निर्णय प्रक्रियेतील वेळेची बचत होऊन, नागरिकांना शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि तक्रारींबाबत माहिती मिळवणे सोपे झाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या प्रशासनाने एक उत्तम टीम वर्क दाखवले व उत्कृष्ट कामगिरी केली. सर्व बाबींच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात लातूर जिल्ह्याने एकूण १७९.२५ गुण प्राप्त करून राज्यातील पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. लातूर जिल्ह्याला गेल्या तीन वर्षात मिळा-लेला हा सातवा पुरस्कार आहे.
सेवाकर्मी कार्यक्रमात चारही नगरपालिकांची बाजी
१५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत नगरपालिका गटात निवड झालेल्या राज्यातील १७ पैकी ९ नगरपालिका या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व चारही नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे मार्गदर्शन व जिल्हा नगरपालिका प्रशासन सहआयुक्त अजितकुमार डोके यांच्या नियोजनातून उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा या ४ नगरपालिका यांना ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.