

Latur Crime News: An organized gang that stole submersible motors and buffaloes has been busted
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. लातूर तालुक्यातील लातूर ते मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर करकटा पाटी येथील एका बारसमोर संशयितरित्या थांबलेल्या चौघांना ताब्यात घेऊन ९.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या पथकाने दि. २४ जानेवारी रोजी दुपारी १४.३० वाजता लातूर ते मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर करकटा पाटी येथे सापळा रचण्यात आला.
येथील बारसमोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनासह चार संशयित इसम संशयास्पदरीत्या थांबले होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले. महादेव उर्फ बापु सुरेश चव्हाण (वय ४५, रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी, जि. धाराशिव), राहुल निवत्ती काळे (वय २३, रा. साठे चौक, धाराशिव), तेजस उर्फ पप्पु भिमराव शिंदे (वय ३५, रा. पिंपळगाव, ता. वाशी), नितीन गजेंद्र काळे (वय ३२, रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी) असे आरोपींचे नाव आहे.
त्यांची अंगझडती व वाहन तपासणी केली असता त्यामध्ये रोख १ लाख ५७ हजार रुपये, ५ एचपी क्षमतेच्या १० पाणबुडी मोटारी, विदेशी दारूचे २३ बॉक्स, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले महिंद्रा कंपनीचे बो-लेरो पिकअप वाहन (एम.एच. ४४ यू १३१६) असा मुद्देमाल मिळून आला. विविध चोरीचा माल विकून मिळालेली रक्कमच त्यांच्या ताब्यात आढळून आ-लेली रोख रक्कम असल्याचे सांगितले.
लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांत चोऱ्या
आरोपींनी कबुली दिली की, ते आपल्या इतर तीन फरार साथीदारांसह गेल्या एक वर्षापासून लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी चोरी करीत होते. शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, कासार शिरसी, वैराग (जि. सोलापूर) या पोलीस ठाण्यामध्ये या टोळी विरुद्ध एकूण १० गंभीर गुन्हे उघड झाले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी वैराग जिल्हा सोलापूर परिसरातील एक बिअर बार अँड परमिट रूम फोडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू चोरी केली होती