

HSC exam center molestation
मुरुड : बारावीच्या परीक्षा केंद्रावर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला लॉजवर बोलावणाऱ्या एका संस्थाध्यक्षाला पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. बाबुराव किसन जाधव असे या आरोपीचे नाव असून, ही कारवाई लातूर शहरातील एका लॉजवर करण्यात आली.
लातूर तालुक्यातील पिंपळगाव (अंबा) येथील परीक्षा केंद्रावर एक महिला मदतनीस म्हणून कार्यरत होती. तिथे उपस्थित असलेले संस्थाध्यक्ष बाबुराव जाधव यांनी पीडितेशी ओळख वाढवून तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर 'जेवण करू आणि तुला पैसे देतो' अशी भुरळ घालत तिला वारंवार भेटण्यासाठी त्रास दिला. महिलेने नकार देऊनही आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला.
त्रासाला कंटाळून पीडित महिला मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली. ती पोलिसांना आपबीती सांगत असतानाच, आरोपी जाधवचा तिला पुन्हा फोन आला. त्याने तिला लातूर शहरातील दयानंद कॉलेजसमोरील एका लॉजवर तातडीने बोलावले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडल्याने पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
पोलिस पथक रवाना: महिलेला आरोपीशी फोनवर बोलत ठेवण्यास सांगून पोलिसांचे एक पथक तातडीने लातूरकडे रवाना झाले.
पोलिसांची एन्ट्री: आरोपी वारंवार फोन करून महिला कुठपर्यंत आली, याची चौकशी करत होता. तो लॉजच्या रूममध्ये महिलेची वाट पाहत बसला होता.
आरोपीची भंबेरी: महिलेऐवजी पोलिसांनीच रूमचा दरवाजा ठोठावला. समोर पोलिसांना पाहताच आरोपीची चांगलीच भंबेरी उडाली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मुरुड पोलीस ठाण्यात आणले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बाबुराव जाधव विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.