

जळकोट : मागील आठवडय़ात ढगफुटीने जळकोट तालुक्यातील प्रत्येक पावसाने गावात हाहाकार माजवला. यावेळी ढोरसांगवी (ता जळकोट ) येथील शेतकरी बालाजी रावसाहेब पोतने वय 47 वर्षे हे दि. 29 ऑगस्ट रोजी पुरात वाहून गेले होते. आज चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. त्यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. 29 रोजी सकाळी शेताकडून घराकडे निघाले होते. मात्र ते चालताना घसरुन एका ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले. ते बराचवेळ घरी आले नसल्याने ते वाहून गेले असण्याची शंका आली.
त्यावरुन ढोरसांगवीच्या नदीमध्ये त्यांचा शोध सुरु होता. उदगीरचे उप विभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण हे तातडीने ढोरसांगवीमध्ये दाखल झाले. चार दिवस हा शोध सुरुच राहिला. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद सूर्यवंशी, ग्राम पंचायत अधिकारी के डी शेवटे, पोलीस अशी प्रशासकीय यंत्रणा ढोरसांगवीत तळ ठोकून होती.
अखेर आज सोमवारी चौथ्या दिवशी बालाजी पोतने यांचा मृतदेह ओढ्याजवळील ऊसाच्या शेतात मिळून आला आहे. त्यांचा मृददेह पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. अतिवृष्टीने तालुक्यातील एका शेतकऱ्याचा बळी घेतला असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.