

लातूर: काँग्रेसमध्ये युवा नेते म्हणून ओळख निर्माण केलेले लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.26) सायंकाळी पक्ष कार्यालयात प्रवेश केला. विक्रांत गोजमगुंडे यांनी यांनी अचानक केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला हादरा बसला असून गोजमगुंडे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेससह भाजपाला आव्हान निर्माण होऊन सारीच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम गोजमगुंडे यांचे विक्रांत गोजमगुंडे चिरंजीव असून ते गोजमगुंडे घराण्याचा राजकीय वारसा चालवत आहेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून विक्रम गोजमगुंडे तर काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेस पक्षात काम केले आहे.
2012 साली विक्रांत गोजमगुंडे काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा निवडून आल्यावर स्थायी समितीचे सभापती बनले. 2019 मध्ये राज्यात महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आणि इकडे नोव्हेंबर 2019 मध्ये दुसऱ्या टर्म मधील महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक फोडून विक्रांत गोजमगुंडे महापौर बनले आणि त्यांच्या रूपाने महापालिकेत काँग्रेसची पुन्हा सत्ता आली. मात्र विक्रांत गोजमगुंडे हे मनाविरुद्ध महापौर बनल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा त्यावेळपासून सुरू झाली. तरीही विक्रांत गोजमगुंडे काँग्रेसमध्येच एकनिष्ठ राहिले.
आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, विक्रांत गोजमगुंडे यांनी 25 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त सायंकाळी लातूरमध्ये धडकले. मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे नेते विजय पारिख, केतन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, विक्रांत गोजमगुंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले, 'दादांना भेटण्यासाठी बीडला गेलो होतो. त्यावेळी दादांनी छत्रपती संभाजी नगर येथून विमानाने मुंबईला नेले आणि आज दादांच्या उपस्थितीत अचानक पक्षप्रवेश झाला. आपली कोणावर नाराजी नाही. सकारात्मक राजकारण करायचे आहे.' अशी प्रतिक्रीया दिली.