

अहमदपूर: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने संतापलेल्या एका 40 वर्षीय शेतकऱ्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज, 23 सप्टेंबर रोजी घडली.
सुभाष ज्ञानोबा पडिले (रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने वेळीच त्यांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नेमकी घटना काय घडली?
मे महिन्यात अहमदपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता, ज्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले, पण ढाळेगाव येथील अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. गावातील ३६ शेतकऱ्यांनाच अनुदान मिळाले, तर उर्वरित शेतकरी वंचित राहिले.
याविषयी अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, तत्कालीन तलाठी, कृषी सहायक आणि मंडळ अधिकारी यांनी जागेवर जाऊन पंचनामे केले नाहीत, उलट हॉटेलात बसूनच हे काम केले.
याच अनुदानाच्या मागणीसाठी आणि आपली कैफियत मांडण्यासाठी सुभाष पडिले आणि काही शेतकरी तालुका कृषी कार्यालयात गेले होते. पण, तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या सुभाष पडिले यांनी कृषी अधिकाऱ्याच्या दालनातील सुरू असलेल्या सीलिंग फॅनला आपल्या गळ्यातील उपरणे बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.