

Latur district Chief Minister A R Antule On Vilasrao Deshmukh
उमेश काळे/शहाजी पवार
छत्रपती संभाजीनगर/लातूर : धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी 1970 पासून सुरू झाली होती. बॅ. अ. र. अंतुले मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या सत्काराला उतर देताना त्यांनी जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात असे सांगत तुम्हाला काय पाहिजे, असे उपस्थितांना विचारले, त्यावर जिल्ह्याची मागणी लोकांनी केल्यानंतर अंतुले म्हणाले, मान्य.. तुम्हाला जिल्हा दिला अशी ग्वाही दिली...आणि त्यानंतर अधिकृत शासनमान्यता घेत आश्वासनाची पूर्तताही केली.
निझामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव हे पाच जिल्हे होते. या जिल्ह्यांचा भौगोलिक विस्तार पाहता जालना, लातूर, हिंगोलीकर जिल्ह्यांची मागणी करीत होते. त्यात प्रथम बाजी मारली ती लातूरने. लातूरसाठी तीव्र आंदोलने होत असल्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख ही दिग्गज मंडळी मुख्यमंत्री अंतुलेंना भेटू लागली. वास्तविक तेव्हाच्या मंत्रिमंडळात विलासरावांचा समावेश करण्यात आला नव्हता. तरी लातूर जिल्ह्यासाठी ते आग्रही राहिले.
अंतुले यांनी जिल्ह्याची घोषणा केली तरी जानेवारी १९८२ मध्ये त्यांना पदावरून जावे लागले. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यानंतर १६ आॕगस्ट १९८२ ला जिल्ह्याचे अधिकृत उद्घाटन झाले. तत्कालिन पाटबांधारे मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, वनमंत्री दिनकरराव चव्हाण, आणि शिक्षण, राजशिष्टाचार मंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्याचे उद्घाटन झाले. (भोसले यांनी विलासरावांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतले होते.) एस. एस. हुसेन यांनी 16 तारखेला जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. 3 जून, 1985 पर्यंत हुसेन या पदावर होते, अशी माहिती लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मिळते. जिल्हा निर्मितीला चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला असून शिक्षण, उद्योग, शेती, सहकार आदी क्षेत्रात लातूरचे लक्षवेधी स्थान आहे.
अंतुलेंच्या डोळ्यात पाणी आले
जिल्हानिर्मितीसाठी शिष्टमंडळ मुंबईत अंतुले यांना भेटले. भेट झाल्यानंतर शिष्टमंडळ हिरवळीवर बसले होते. तेव्हा निलंगेकरांनी प्रतिज्ञा केली की लातूर जिल्हा झाल्याशिवाय मी लातुरात पाय ठेवणार नाही. ऐनकेन प्रकारे सरकारवर स्वपक्षियांनीच दबाव वाढविला होता.
लातूर जिल्ह्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याचे ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख होती. त्यांनी या सोहळ्याला जाणीवपूर्वक बॅ. अंतुले यांना बोलाविले. यासंबंधीची आठवण आ. अमित देशमुख यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांनी शेअर केलेला किस्सा पुढीलप्रमाणे.
अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात विलासरावांना मंत्रिपद नव्हतं, असे असताना विलासरावांनी अंतुलेचा लातूरमध्ये सत्कार करायचे ठरविले. त्यावेळी भाषणात अंतुले यांनी विलासरावांची आठवण सांगितली. साहेब लातूरला मंत्रिपद नाही..पण आम्हाला लातूर जिल्हा तर द्या..मी म्हणालो ’दिला’..!! आणि लातूर जिल्हा निर्माण झाला, अंतुले साहेबाना बोलविण्याचे ठरविले... अंतुले भाषणात म्हणाले, विलासराव एक जिल्हा निर्माण करणं हे काही मोठं काम नाही, मी तुम्हाला मंत्री केलं नसताना, फक्त लातूर जिल्हा निर्माण केला म्हणून मला आज बोलवले, माझा सत्कार केला, विलासराव राजकारणात 25 दिवस कोणी लक्षात ठेवत नाही, तुम्ही 25 वर्ष मला विसरला नाहीत हो...आणि अंतुले साहेबांच्या डोळ्यात पाणी आले, यावेळी विलासराव आणि अख्खी सभा हळहळली.
लातुरात विभागीय कार्यालये
महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे लोकनेते विलासराव देशमुख यांचे नेतृत्व कर्तृत्व त्यांच्या निर्लोभी व निरपेक्ष वृत्तीने लोकमान्य झाले होते. सामान्य माणूस ही त्यांची श्रद्धा होती व त्यांचे समाधान हा त्यांचा ध्यास होता व तो त्यांनी तह्यात जपला. लातुर हा तर विलासरावांचा श्वास होता म्हणून या शहराला या जिल्ह्याला त्यांनी अपेक्षा पल्याड भरभरून दिले. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रशासकीय सुसूत्रतेसाठी त्यांनी आखलेले आराखडे व आणलेली विविध कार्यालय याची आजही साक्ष देत आहेत.
विलासरावांनी लातूरला तब्बल 36 विभागीय कार्यालये आणली. ती आणण्यापूर्वी अद्यायावत देखण्या इमारती उभारल्या आरोग्यासाठी त्यांनी दुर्दृष्टीने उभारलेल्या अद्यावत रुग्णालयात कोवीडकाळात मोठ्या संख्येत रुग्णांनी उपचार घेतला. ही रुग्णालये लौकीकअर्थाने रुग्णालये असतील कोवीड काळी ती मानवतीर्थच झाली होती. विकासात त्यांनी कधीही राजकारण आणले नाही म्हणून ते विरोधकांनाही आपलेसे वाटत असत. दुर्दैवाने विलासराव देशमुख यांचे जिल्हा वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला १४ आॕगस्ट २०१२ रोजी निधन झाले.