

Latur Crime News : Inter-district gang of oxygen cylinder theft busted
लातूर, पुढारी वृत्तसेवा : ऑक्सिजन सिलिंडरच्या लोखंडी टाक्या चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारी साखळीचा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून २० ऑक्सिजन सिलिंडरच्या टाक्या, १ लाख ७७ हजार रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १४ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत लातूर जिल्ह्यातील दहा आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील एक अशा एकूण ११ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. ४ नोव्हेंबर रोजी पथक ऑक्सिजन सिलिंडर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना काळे बोरगाव येथील तानाजी चौक परिसरात बोलेरो पिकअपमधून चोरीचे सिलिंडर विक्रीसाठी घेऊन एकजण थांबल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उमाकांत सुरेश पानगावकर (वय ३६, रा. पिंप्री अंबा, ता. जि. लातूर) याला वाहनासह ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या लोखंडी टाक्या आढळल्या. तसेच आरोपीच्या अंगझडतीत ५१ सिलिंडरच्या टाक्यांच्या विक्रीतून मिळालेली १ लाख ७७ हजार रुपयांची रोकड सापडली.
अधिक चौकशीत अहमदपूर, बुधोडा, जांब यांसह विविध ठिकाणांहून सिलिंडरच्या टाक्या चोरल्याचे निष्पन्न झाले. या तपासातून विवेकानंद चौक, रेणापूर, अहमदपूर, गांधी चौक, एमआयडीसी, मुरूड, चाकूर आणि औसा पोलीस ठाण्यांसह नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांची उकल झाली.
जप्त मुद्देमालामध्ये १ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या २० लोखंडी टाक्या, १ लाख ७७ हजारांची रोकड आणि १२ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, राजेशकंचे, आनंद हल्लाळे, गोविंद भोसले, पाराजी पुठेवाड, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे आणि रामदास बाचीफडे यांच्या पथकाने केली.