

A sweet Diwali for farmers; sugarcane bill payments credited by Vilas Sugar Factory
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्याच्या निवळी आणि तोंडार (उदगीर) येथील दोन्ही कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाचा प्रतिटन तीन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. दोन्ही कारखान्यांकडून एकूण ३३ कोटी ३८ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
मांजरा परिवारातील कारखाने यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन तीन हजार रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली होती. गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनीही या घोषणेनुसार मराठवाड्यात सर्वाधिक ऊसदर देण्याची ग्वाही दिली होती.
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळीच्या वतीने १६ कोटी ८ लाख ९३ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या कारखान्याचे आतापर्यंत १४ दिवसांत ७३ हजार ९७० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ६१ हजार ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याचा साखर उतारा ८.५० टक्के आहे. विलास सहकारी साखर कारखाना, तोंडार (उदगीर) यांच्या वतीने १७ कोटी ३० लाख रुपये पहिला हप्ता म्हणून जमा करण्यात आले आहेत. या कारखान्याने १९ दिवसांत ७३ हजार २८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ६३ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
कारखान्याचा साखर उतारा ८.८५७ टक्के आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याकडे गाळपासाठी आला आहे, त्यांनी संबंधित बँक शाखेतून बिलाची रक्कम उचल करून घ्यावी, तसेच जास्तीत जास्त ऊस विलास कारखान्याला पुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हाइस चेअरमन माजी आ. वैजनाथराव शिंदे, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे. दरम्यान आ. अमित देशमुख यांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून विक्रमी गाळप साध्य करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी सर्वांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.