

Chakur Bus Stand CCTV Issue
चाकूर : तालुक्याचे प्रमुख केंद्र असलेल्या चाकूर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, या गंभीर परिस्थितीस जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकातील मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे चोरी, छेडछाड अथवा इतर अनुचित प्रकार घडल्यास त्याची नोंद घेणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची असलेली ही यंत्रणा दीर्घकाळापासून बंद असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
बसस्थानक प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रयत्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे.
सीसीटीव्हीप्रमाणेच बसस्थानकातील पंखे, फोकस लाईट आणि इतर सुविधाही अनेक दिवसांपासून बंद आहेत. संपूर्ण परिसरात केवळ एकच फोकस लाईट सुरू असल्याने रात्रीच्या वेळी बसस्थानक अंधारात बुडालेले असते. यामुळे रात्री मुक्कामी असणारे चालक व वाहक यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहकांकडे दिवसभरातील तिकीट विक्रीची रोख रक्कम असल्याने चोरीच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही.
चाकूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये नवीन बसस्थानके उभारली गेली असताना चाकूर बसस्थानकाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, लाईट व पंखे तातडीने सुरू करावेत. तसेच चाकूरसाठी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन बसस्थानक मंजूर करून विकास प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या संदर्भात विभाग नियंत्रक राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सुविधांच्या अभावामुळे बसस्थानक विकासापासून वंचित?
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे राज्य परिवहन महामंडळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव आणि रखडलेला विकास यामुळे चाकूर बसस्थानक विकासापासून वंचित राहिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.