

Ausa Taluka Nagarsoga farmer death
औसा: तालुक्यातील नागरसोगा येथील एका शेतकऱ्याचा स्वतःच्या शेताजवळ पवन चक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी हा व्यक्ती शेतावरून आला नाही. म्हणून त्याची शोधाशोध केली जात होती. पण कुठेच मिळून आला नाही. आज (दि.२५) सकाळी पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की नागरसोगा येथील राजकुमार शेषराव अडसुळे ( वय 45) शेतकरी मंगळवारी (दि 23) दुपारी आपल्या शेताकडे गेला होता. दुपारी शेताकडे गेलेला व्यक्ती रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण त्याचा कुठेच तपास लागला नाही. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात दोन वेळा ढगफुटी सदृश पाऊस नागरसोगा व परिसरात सुरू होता. या पावसातही त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेल्यानंतर शेतातील बंधाऱ्यावर त्याची मोटारसायकल आणि डिक्कीमध्ये मोबाईल व मोटार सायकल शेजारी त्याच्या पायातील चपला सापडल्या होत्या.
पाऊस व अंधार असल्याने त्याचा परत बुधवारी शोध घेतला पण तो कुठेच दिसून आला नाही. अखेर गुरुवारी सकाळी मात्र पवनचक्की साठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत औसा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. औशाचे पोलीस निरीक्षक रेवण ढमाले, बीट अंमलदार दिनेश गवळी, अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
जवळगा पोमादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नागरसोगा येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. औसा पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास दिनेश गवळी करीत आहेत.