

Annatyag protest Koli Mahadev community
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पूर्वी दाखल केलेल्या प्रलंबित प्रकरणाचा व नवीन दाखल केलेल्या जातीच्या प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे यावे, या मागणीसाठी सोमवारपासून (दि. २१) मराठवाड्याचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मागील ११ महिन्यापूर्वी निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळावे, म्हणून अर्ज दाखल केले आहेत. परंतु, सदर प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याकडून पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा अथवा वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीचा शेरा मारून हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. हा प्रकार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्याचेही उल्लंघन होत असून संबंधित अर्जदारास त्रुटींची पुर्तता कळवणे अवश्यक असताना जाणूनबुजून हेतू पुरस्कृत याप्रकरणी दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक वेळा लेखी व तोंडी माहिती कळवली आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून याकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी कोणतेही पुरावे न मागता 'कोळी महादेव' जमातीचे हजारो जात प्रमाणपत्र वितरित केले आहेत. परंतु केवळ 'कोळी महादेव' समाजासाठी सध्या अतिरिक्त पुरावे मागून जातीच्या दाखल्याची प्रकरणे प्रलंबित ठेवले जात आहेत. जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे म्हणून यापूर्वी कोळी महादेव समाजाकडून दंडवत आंदोलन, जलसमाधी आंदोलन, मुंडन आंदोलन असे आगळे वेगळे आंदोलन करूनही दाखले दाखले मिळत नाहीत, म्हणून मराठवाडा अध्यक्ष चंद्रहास नलमले, हरिश्चंद्र मुडे, माधव पिटले, नरसिंग धनेवाड, भरत डोपेवाड, बालाजी औटी, प्रशांत निंगाले हे सात जण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनात महिला, पुरूष उपस्थित आहेत.
टी.सी, बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या जात प्रमाणपत्र अंधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अकरा महिन्यांपूर्वी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, महाराष्ट्र शासनाने १९६६ प्रमाणे ३६ व ३६ अ नोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबारावर नोंदणी करावी व त्याआधारे प्रमाणपत्र देण्यात यावे, वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी रक्त नात्याचे परिपत्रक काढावे, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, ढोर कोळी यांचा १९५० पूर्वीचा कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.