

Chhava Sanghatna Protest vs NCP
लातूर : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष व संघटनाच्या वतीने लातूर बंदची हाक रविवारी रात्री उशिरा देण्यात आली होती. त्यानुसार आज (दि.२१) लातूर शहरात बंद पाळण्यात येत आहे. सकाळी विविध पक्ष व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात मोटार सायकल रॅली काढली व बंदचे आवाहन केले.
या हल्ल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारे आंदोलने करणाऱ्या वरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, असे बजावत सोमवारी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मारहाणीचा निषेध केला. हा प्रकार निंदनीय असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सुरज चव्हाण यांना बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय कुमार घाडगे यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोली येथील गोरेगाव या ठिकाणी टायर जाळत निषेध करण्यात आला. यावेळी सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करून कङक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर रम्मी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करून कनेरगाव-जिंतूर महामार्ग अडवला होता. यावेळी टायर जळत मोठ्या घोषणाबाजी करण्यात आल्या.
यावेळी गजानन कावरखे (क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष) नामदेव पतंगे, शांतीराम सावके, संतोष सावके, राहुल कावरखे आदी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.