

धाराशिव (लातूर) : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरकडे पायी येत असल्याने प्रशासनाने यावर्षीही वाहतूक मार्गात बदल केले आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद आणि सोलापूर मार्गावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
कोजागिरी पौर्णिमा (६ ऑक्टोबर) व तर मंदिर पौर्णिमा मंगळवार (दि.७) निमित्ताने भाविकांची यंदाही मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून प्रशासनाने नियोजन केले आहे. अपघात वा कायदा-सुव्यवस्था ढासळू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. ४ च्या मध्यरात्रीपासून मंगळवार (दि.७) मध्यरात्रीपर्यंत वाहतूक मार्गात तात्पुरते बदल लागू केले आहेत. जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या आदेशानुसार तुळजापूर शहर व परिसरातून सर्व प्रकारच्या वाहनांना (हलके व जड) मनाई करण्यात आली आहे.
बंदी असलेले मार्ग छत्रपती संभाजीनगर-हैद्राबाद, हैदराबाद छत्रपती संभाजीनगर, लातूर-सोलापूर, सोलापूर-लातूर, छत्रपती संभाजीनगर-सोलापूर, सोलापूर-छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर-बार्शी व बार्शी-तुळजापूर या प्रमुख मार्गावर वाहतुकीस बंदी राहील.
पर्यायी मार्ग: छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादकडे जाणारी वाहतूक बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाई, लातूर, औसा, उमरगा किंवा बीड, येडशी, ढोकी, मुरुड, लातूर, औसा, उमरगा मार्गे सोडण्यात येईल. हैदराबादहून छ. संभाजीनगरकडे येणारी वाहतूक उमरगा औसा लातूर अंबाजोगाई, मांजरसुंबा, येईल. धाराशिव -बीड किंवा उमरगाऔसालातूर मुरुड ढोकी, येडशी, बीड मार्गे वळविण्यात सोलापूर व सोलापूर-धाराशिव वाहतूक वैरागमार्गे वळवली जाईल. लातूर-सोलापूर वाहतूक मुरुड ढोकी येडशी बार्शीमार्गे, तर सोलापूर-लातूर वाहतूक बार्शी येडशी ढोकी मुरुडमार्गे जाईल. छत्रपती संभाजीनगर- सोलापूर वाहतूक येरमाळा बार्शीमार्गे, तर सोलापूर छत्रपती संभाजीनगर वाहतूक बार्शी येरमाळामार्गे सोडण्यात येईल. तुळजा-पूर-बार्शी वाहतूक धाराशिवमार्गे, तर बार्शी-तुळजापूर वाहतूक वैराग धाराशिवमार्गे वळवली जाईल. तुळजापूर-सोलापूर वाहतूक मंगरुळ पाटी इटकळ बोरामणीमार्गे, तर सोलापूर-तुळजापूर वाहतूक बोरामणी इटकळ मंगरुळ पाटीमार्गे जाईल. या निर्बंधातून पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा व एसटी बसेस यांना सूट देण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षितता व शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.