

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कळमगाव येथील अनंत तातेराव शिंदे (वय ५०) यांचा मृतदेह औसा तालुक्यातील जुना सेलू रोडवरील कारजे खंडी केंद्राजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत अनंत शिंदे हे कळमगावचे रहिवासी असून गावातील एका संस्थेचे चेअरमन होते. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते.
प्राप्त माहितीनुसार, शिंदे यांनी मानसिक तणावाखाली काचेची बाटली फोडून तिच्या तुकड्यांनी स्वतःच्या पोटावर वार केले असल्याचे निष्पन्न झाले असून, अति रक्तस्रावामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू (AD) क्र. 46/2025 कलम 194 B.N.S.S. नुसार नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह सर्वप्रथम त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र विठ्ठलराव शिंदे (वय ६०, रा. कळमगाव) यांच्या निदर्शनास आला. त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय डाके हे करत असून, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कळमगाव व शिरूर अनंतपाळ परिसरात शोककळा पसरली आहे. अनंत शिंदे हे एक सक्रिय व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.