

chakur bypass accident
चाकूर: जनगणनेची ड्युटी करून परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर चाकूर बायपास उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.१६) झालेल्या भीषण अपघातात जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुंदरम शिवाजी वांगस्कर (वय २९) गंभीर जखमी झाले होते. त्यांचे बुधवारी (दि.२०) सकाळी उपचारादरम्यान लातूर येथे निधन झाले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सुंदरम वांगस्कर हे लातूर तालुक्यातील मसला गावचे रहिवाशी होते. आई वडिलांस एकुलता एक मुलगा असून त्याची पवित्र पोर्टलमार्फत जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवारी १६ मे रोजी दुपारी जनगणनेची ड्युटी पूर्ण करून ते एका महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या वाहनातून लातूरकडे परतत होते.
दरम्यान, चाकूर येथे त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुंदरम वांगस्कर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
सुंदरम वांगस्कर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनतीने अभ्यास करून महाराष्ट्र शासनाची २०२२ ची टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत त्यांची जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी पाच वाजता मसला या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.