

Inauguration of Samadhan Camp in Gategaon
लातुर, पुढारी वृत्तसेवाः भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत गातेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचे उद्घाटन आ. कराड यांच्या हस्ते झाले याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, विभागीय सहआयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, अप्पर तहसीलदार सागर मुळीक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमशिंदे यांच्यासह विविध गावचे सरपंच, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. रमेशअप्पा कराड म्हणाले मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ता योजना राज्यशासनाने हाती घेतली असून पहिल्या टप्प्यातील रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. येत्या दोन वर्षात लातूर ग्रामीण मतदार संघातील एकही शिवरस्ता शिल्लक राहणार नाही. स्वतःचे कबाले नसल्यामुळे अनेकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता या पुढील काळात एकही पात्र लाभार्थी कबाल्यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती आ. कराड यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी प्रत्येक योजनेचा लाभ त्या त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिबिरातून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि योजनांची माहिती उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे यांनी दिली प्रारंभी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रास्ताविक केले. गोविंद शिगडे यांनी आभार मानले.
या समाधानशिबिरात कबाले मालकीपत्र, ऊस तोडणी यंत्र, ट्रॅक्टर वाटप, संगायो पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, डिजिटल शिधापत्रिका, घरकुलासाठी पाच ब्रास वाळूचे कुपन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान, लेक लाडकी योजनेचा हप्ता वाटप, दुधाळ गट, बेबी केअर किट, रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्र, जिवंत सातबारा, डिजिटल सातबारा, प्रलंबित फेरफार, आयुष्यमान भारत कार्ड, गातेगाव मंडळ गावातील गाव नकाशे, लखपती दीदी योजनेचे पत्र यासह विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्राचे व प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गातेगाव महसूल मंडळातील जवळपास सर्वच चौदाही गावातील नागरीक मोठ्या संख्येने होते.