

Implement preventive measures to maintain law and order during the election period: District Collector
लातूर, पुढारी वृत्तसेवाः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी (दि.२१) येथे दिल्या.
निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी असलम तडवी, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत उपस्थित होते. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते
निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यासह मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरातील सुरक्षा नियोजनाला प्राधान्य द्यावे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास, अशा ठिकाणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घ्यावा.
याठिकाणी मतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या तसेच आचारसंहिता भंगाची बाब निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हा दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके व उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली. करण्याच्या सूचना
अतिरिक्त बंदोबस्त मागवणार अमोल तांबे
निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक पूर्वतयारी केली आहे. प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून मतदान व मतमोजणी या दोन दिवसांचा सुरक्षा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात बाहेरून पोलीस अधिकारी व कर्मचारी येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त तैनात केला जाईल. प्रत्येक तालुकास्तरीय पोलीस नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून बंदोबस्ताचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिल्या. पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.