

अंबाजोगाई : तालुक्यातील सायगाव येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्रे बाळगून गोळीबार करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील मौजे सायगाव येथे २१ जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी (वय ३५) याने स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्रे ठेवून, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी तातडीने हालचाली करून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलीस हवालदार गणेश विक्रम तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी व झडती दरम्यान आरोपीकडे एक विदेशी बनावटीची ('Made in USA') ९ एमएम पिस्टल, एक 'Made in Japan' बनावटीची सिल्वर रंगाची रिवॉल्वर, तीन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल (क्र. MH 23 R 0317) मिळून आली आहे.
बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम (Arms Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सध्या गावात शांतता असून, आरोपीकडे ही शस्त्रे कोठून आली याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत.