

Impact of mandatory helmet rule: Rate of accidental deaths declines
लातूर, पुढारी वृत्तसेवाः 'लातूरकरांनो, हा घ्या पुरावा' असे म्हणत लातूर पोलिसांनी हेल्मेट सक्तीच्या महिनाभरातील परिणामांची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये जिल्ह्यात रस्ते अपघातांत ३३ जणांचा मृत्यू झाला होता. हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही संख्या १३ वर आली. त्यामुळे महिनाभरात अपघाती मृत्यू २० ने घटल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या २२ हजार ९०७जणांवर कारवाई करण्यात आली.
रस्ते अपघातांतील जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली. त्यापूर्वी मार्चपासून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जनजागृतीसोबतच कायदेशीर कारवाईवर भर देण्यात आला. महिनाभरात २२ हजार ९०७ विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली.
केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजीनागरिकांनी हेल्मेट वापरावे, याला पोलिसांनी प्राधान्य दिले. कारवाईच्या ठिकाणी हेल्मेट खरेदीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. हेल्मेट खरेदी करून वापरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईपासून दिलासा देण्यात आला. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये अपघातांत २३ जणांचा मृत्यू झाला होता.
यंदाच्या सप्टेंबरमध्ये ही संख्या १३ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेतही अपघाती मृत्यू कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या घटेमागे विविध घटकांचा परिणाम असू शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हेल्मेट वापराबाबतची जनजागृती आणि अंमलबजावणीमुळे रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेल्मेट म्हणजे सुरक्षाकवच
अपघाती मृत्यूतील २० ची घट ही केवळ आकडेवारी नसून २० कुटुंबांवर आलेले संभाव्य संकट टळल्याचे महत्त्व ती सांगते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे, हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. 'एक हेल्मेट-एक सुरक्षित प्रवास; सुरक्षित प्रवास- सुरक्षित कुटुंब' हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.