

ईट ( लातूर ) : समाधान डोके
आपल्या देशाला इंग्रजांच्या जोखडातून स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाले असले तरी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतच होता. या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले. यात ईट येथील चार हुतात्म्यांचाही समावेश आहे. निजाम राजवटीविरुद्धच्या उठावात ईटसह परिसरातील अनेक गावांनी सहभाग घेतला होता. यामध्ये घाटनांदर, अंजनसोंडा, डोकेवाडी, घाटपिंपरी आदी गावांच्या तरुणांनी आर्य समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन बंड पुकारले होते.
यासाठी मवाळ आणि जहाल असे दोन गट तयार करण्यात आले. मवाळ गट गावागावात जाऊन राष्ट्रगीत म्हणून प्रभातफेरी काढत आणि ध्वजवंदन करत होते. परांडा तालुक्यातील कुक्कडगाव येथे ६० ते ७० तरुणांनी अशीच प्रभातफेरी काढली. यामुळे चिडलेल्या रझाकारांनी पोलिसांकडून या युवकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये ४४ ते ४६ तरुणांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. यानंतर हैद्राबाद मुक्तिसंग्रामाने उग्र रूप धारण केले. जहाल गटाने निजामाचे करवसुली नाके जाळणे, पोलिसांच्या चौक्या उद्धस्त करणे आणि रझाकारांना ठार मारणे अशी कृत्ये केली.
रझाकार आणि त्यांच्या पोलिसांनी संतापून जाऊन या कॅम्पचे प्रमुख असलेल्या ईट येथील किसनराव तात्याबा टेके यांच्या घरावर हल्ला केला. त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरावर चोहोबाजूने हल्ला करत किसनराव टेके यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात किसनराव टेके यांना हौतात्म्य प्राप्त झाले. ही घटना त्यांची पत्नी गोदावरीबाई किसनराव टेके यांना समजताच त्यांनीही या रझाकारांशी मुकाबला केला. त्यांनी बंदक घेऊन निजामाच्या विरोधात गोळीबार सुरू केला. मात्र, या गोळीबारात त्यांनाही गोळी लागली आणि त्यांनाही हौतात्म्य प्राप्त झाले. या पती-पत्नींनी मे १९४८ साली आपले बलिदान दिले. यानंतर या लढ्याने आणखी उग्र रूप धारण केले. रझाकारांना ईट येथील काही तरुण पारगावकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या तरुणांचा पाठलाग सुरू केला. हे सर्व तरुण डोकेवाडी
शिवारातील तुकाराम पवार यांच्या उसात लपले असल्याची कुणकुण त्यांना लागली. त्यांनी उसाच्या फडात वेढा घालून तो पेटवून दिला. यात काही तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र ईट येथील विश्वनाथ आप्पा तेली आणि मारुती नारायण माळी हे दोघे रझाकारांच्या हाती लागले.
रझाकारांनी विश्वनाथ आप्पा तेली आणि मारुती नारायण माळी या दोघांनाही ठार मारले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांचे शिर धडावेगळे केले. ते शिर त्यांच्या कळंब येथील मुख्यालयाकडे घेऊन जात असताना, तेथील तरुणांनी त्यांना वाटेत अडवले. त्यांनी रझाकारांच्या ताब्यातून ते शिर घेतले आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात रघुनाथ टेके, गणपती लोखंडे, मनोहर चव्हाण, किसनराव वेदपाठक, मारुती ढवळशंक, माणिक कवडे, कलावती राऊत, लिंबा भोसले, लक्ष्मण डंबरे, बाबा राऊत, उत्तरेश्वर स्वामी, श्रीहरी वारे, कोडींबा वाणी, महादेव लिमकर, केशव देशमुख आदी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या लढ्यास यश प्राप्त केले.