

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
Marathwada Mukti Sangram Din: हैदराबादच्या निजाम आणि रझाकारांविरोधात झालेल्या संघर्षात मराठवाड्यातील दलित आणि वंचित घटकांतील कार्यकर्तेही सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मक्ररणपूर येथे झालेल्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निजामी राजवटीत दलित समाजाला अवमानाची वागणूक मिळत असल्याची टीका केली होती. तसेच डॉ. देवराव कांबळे यांच्यासह अन्य काही सहकाऱ्यांनी रझाकारांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.
डॉ. आंबेडकरांनी निजामी राजवटीचा तिढा सोडविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना सहकार्य केले होते, अशा नोंदी आहेत. हैदराबादचे संकट हे हिंदू-मुस्लिम संघर्षापेक्षाही घातक आहे. त्याची परिणती छोट्या-छोट्या शत्रुत्व असणाऱ्या देशांत होईल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला होता. निजाम भारतात विलिनीकरणासाठी सहजपणे तयार होत नसल्याने लष्करी कारवाईचा निर्णय पटेलांनी घेतल्यानंतर, या कारवाईस ‘पोलीस ॲक्शन’ असे म्हणावे, अशी सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. "लष्करी कारवाई" म्हटल्यास हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची ही सूचना त्यावेळी अत्यंत दूरदर्शी ठरली.
नांदेडचे पहिले खासदार डॉ. देवराव कांबळे (पाथ्रीकर) यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक डॉ. श्रीकृष्ण पाथ्रीकर कांबळे यांनी लिहिले आहे. या पुस्तकात डॉ. कांबळे यांनी रझाकारांविरोधात दलित वर्गाने दिलेल्या लढ्याची माहिती दिली आहे. त्यात नमूद केलेले दोन प्रसंग पुढीलप्रमाणे — परभणी येथील लहुजीनगर परिसरात डॉ. कांबळे यांनी महार समाजाच्या तरुण पोरांना रझाकारांच्या अन्याय-अत्याचारांविरुद्ध संघटित केले.
रझाकार दलित वस्तीत येऊन कुणाला त्रास देऊ लागले किंवा महिलांची छेड काढू लागले, की तरुण मुले गुंडांना मारून हाकलून द्यायची. देवराव यांच्याकडे तलवारी, भाले, जंबिया, एक बंदूक, देशी पिस्तूल अशी शस्त्रे होती. लिंबाजी शिंदे यांच्या घराशेजारी एका झाडाला घंटा बांधण्यात आली होती. रझाकार शिरले की घंटा वाजवायची; मग तरुण मंडळी झाडाखाली जमत. अशा रीतीने अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या तरुणांची पिढी डॉ. देवराव कांबळे यांनी निर्माण केली होती.
डॉ. देवराव कांबळे हे हैदराबाद लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटवर्ती होते. वेष बदलून रझाकारांमध्ये राहून गुप्त बातम्या पुरविण्याचे कामही ते करीत. काहींनी त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे हेर आहेत, असे समजून त्यांचा खून करण्याचा कट रचला होता. पण त्यांच्या अंगावरील खिशात स्वामीजींचे पत्र सापडल्यामुळे ते बचावले, असा प्रसंगही डॉ. श्रीकृष्ण पाथ्रीकर कांबळे यांच्या पुस्तकात नमूद करण्यात आला आहे.