

Husband kills wife with axe over domestic dispute
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा :
जेवण वाढण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे घडली. रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा निघृण खून केला. ही घटना शनिवारी (दि. २९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः रेणापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.
चंद्रकांत बाबुराव मदने (वय ५५) असे आरोपी पतीचे नाव असून, मीराबाई चंद्रकांत मदने (वय ४५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे घनसरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनसरगाव येथील चंद्रकांत मदने आणि त्यांची पत्नी मीराबाई हे दोघे शनिवारी आपल्या शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. दुपारच्या वेळी चंद्रकांतने पत्नीकडे जेवण वाढण्याची मागणी केली. यावेळी कामात असलेल्या मीराबाईंनी पतीला तुम्ही तुमच्या हाताने जेवण वाढून घ्या, असे म्हटले. पत्नीच्या या उत्तराचा चंद्रकांतला प्रचंड राग आला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. रागाचा पारा चढल्याने चंद्रकांतने जवळच असलेली कु-हाड उचलली आणि मीराबाईंच्या डोक्यात जोरात घाव घातले.
मीराबाई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्या त्यानंतरही चंद्रकांतने त्यांच्यावर सपासप वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर थेट पोलिस ठाण्यात पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच चंद्रकांत मदने हा थेट रेणापूर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना घटनेची कबुली दिली.
पोलिसांनी तत्काळ घनसरगावचे पोलीस पाटील आणि मयताच्या मुलाशी संपर्क साधून घटनेची शहानिशा केली. माहिती खरी असल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनाची भेट घटनेची माहिती मिळताच चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पीएसआय डोईफोडे, बीट अंमलदार बालाजी डप्पडवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आरोपी चंद्रकांत मदने याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्षणिक रागातून संसाराची राखरांगोळी
केवळ जेवण वाढून देण्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नीचा जीव घेतला. या क्षणिक रागामुळे ४५ वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला, तर ५५ वर्षीय पतीला गजाआड जावे लागले आहे. या घटनेमुळे एका क्षणात सुखी संसाराची राखरांगोळी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.