

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहरातील एका घोड्यास ग्लैंडर्स या रोगाची लागण झाली असून चार संशयित आहेत. हा रोग अत्यंत संसर्गजन्य व माणसांमध्येही सहज पसरणारा असल्याने जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. संसर्ग झालेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील घोड्यांचे रक्तजलनमुने व नाकातीस खाव निदानासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. या घोड्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांचीही आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाने आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
मे महिन्यात लातूर शहरातील एका घोड्यात ग्लैंडर्सची लक्षणे दिसली होती. उपचाराला त्याची प्रकृती साथ देत नव्हती. त्याच्या अंगावर गाठी होत्या, त्याला ताप होता तसेच जखमेतून व नाकातून पू येत होता. ही लक्षणे गांर्भीयाने घेत त्या घोड्याच्या रक्ताचे नुमने हरियाणा येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळेत निदानासाठी पाठवले होते.
त्याचा अहवाल पॉजेटिव्ह आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्या बाधित घोड्याला दयामरण देण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, मनपा, पोलिस प्रशासन तसेच अश्व मालकांची संयुक्त बैठक घेतली.
याबैठकीत पशुसंवर्धन विभागाने घोड्यांचे रक्त नमुने संकलन करून प्रयोगशाळेत वेळेत पाठवावेत. आरोग्य विभागाने मानवामध्ये होणाऱ्या लक्षणांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी. महानगरपालिका व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिसरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि माहिती प्रसाराचे कार्य हाती घ्यावे. पोलिस प्रशासनाने घोड्यांची वाहतूक र्थांबवण्यासाठी उपाय योजना करावी असे निर्देश देण्यात आले.