

heavy rain in Dhadkanal and Borgaon
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : उदगीर तालुक्यात सीमावर्ती भागात असलेल्या धडकनाळ व बोरगावात रविवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव केले. या पावसाने लेंडी नदी व तिच्या ओढ्याला पूर आला त्याचेही पाणी गावांत शिरले व यात या गावातील अनेकांचे संसार वाहून गेले गोठ्यांनी पाणी शिरल्याने त्यात अनेक गुरे बुडून मरण पावली असून बरीच वाहून गेली आहेत. घरांची पडझड झाली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन अडीचशेपेक्षा अधिक व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
रविवारी रात्री उदगीर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. सोमवारी पहाटे जोरदार अतिवृष्टी झाली. गावलगतच्या नदीला तसेच ओढघाला पूर आला काही कळते न कळते तोच घरा गोठ्यांनी शिरले. या गावांच्या सखल भागातील घरांनी तीन ते पाच फूट पाणी थांबले. अन्न धान्य संसारोपयोगी वस्तु त्यात बुडाल्या. माणसे कशीबशी बाहेर पडली व सुरक्षित स्थळी त्यांनी आसरा घेतला, परंतु त्यांना त्यांच्या पशुधनास वाचवणे त्यांना शक्य झाले नाही.
गोठ्यांनी पाच फुटांपेक्षा अधिक पाणी थांबल्याने त्यात बुडून अनेक गुरांचा जागीच मृत्यू झाला तरी बरीच पाण्यात वाहून गेली. गावातील अनेक घरांची पडझड झाली. अनेक ग्रामस्थांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पुराच्या पाण्यात शेळ्या, जनावरे, ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले आहे. हजारो एकर शेतीतील माती खरडून गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री झालेल्या पावसाने लेंडी नदीला पूर आला असून धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरले. बोरगावने अक्षरशः तळ्याचे रूप धारण केले होते. या गावाच्या चारही बाजूंनी पाण्याने वेढला गेला आहे. रात्री दोन वाजल्यापासून गावकप्यांनी आहे त्या अवस्थेत रात्र काढली. उदगीर मुखमाबाद देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झाला. धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने पहाटे तीन वाजल्यापासून मदत व पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टी बाधितांसाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब, व्यापारी गणेश मंडळ अशा दहा स्वयंसेवी संस्थामार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी सांगितले. पशुधनाची मोठी हानी झाली असून मृत गुरांचे पंचनामे तसेच जखमी गुरांवर पथकामार्फत उपचार सुरू असल्याचे लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले,
वीजतारा, पोलसह रोहित्रे कोसळून दोन्ही गावांचा वीजपुरवठा रविवार रात्रीपासून खंडित झाला आहे. या गावांना बीजपुरवठा करणारे सात रोहित्रे, उच्चदाबाचे ४० पोल तर लघुदाब वीजवाहिनीचे ७० ते ८० पोल कोसळून जमीनदोस्त झाले आहेत. परिणामी या दोन्ही गावांतील ३०० बीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणने वीजयंत्रणा उभी करण्याचे काम सुरू केलेले आहे.
पशुसंवर्धन विभागाने सोमवारी सकाळपर्यंतच्या पाहणीत ९ मोठ्या जनावरांचे व ७शेळ्यांचे मृतदेह आढळले आहेत. तथापि अनेक गायी, म्हशी व शेळ्या पाण्यात बाहुन गेल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने हरवलेल्या जनावरांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. या गावांतील पशुधनांची संख्या ९५८ अशी आहे या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.
सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कृष्णा पांडे व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. विजय घोणशीकर यांच्या नेतृत्वाखाली सात शोघ्र कृत्तिदल घटनास्थळी कार्यरत असल्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. श्रीधर जी शिंदे व विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, लातूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुलेमान दायमी यांनी सांगितले.