

निलंगा : शेतात पिकांची पाहणी करायला गेलेल्या शेतकऱ्याचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास वळसांगवी शिवारात घडली. फुलचंद जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिरोळ येथील शेतकरी फुलचंद जाधव यांची वळसांगवी शिवारात गट नंबर १८ येथे शेती आहे. रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने ते ऊसाचं काही नुकसान झाले का? हे पाहण्यासाठी सकाळीच्या सुमारास शेतात गेले होते. यादरम्यान शेतातील ऊसामधून गेलेल्या खांबावरील विजेचे एक तार तुटून पडली होती. विजेचा प्रवाह सुरू असलेल्या या तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडील शेतातून अजून परतले नसल्याने मुलाने शेतात जाऊन शोध घेतला असता वडिलांना विजेच्या तारेचा शॉक लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने वीज वितरणाशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडीत करण्यास सांगितला. व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह शेतातून बाहेर काढला. याप्रकरणी निटुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.