

Chakur Taluka heavy rainfall disrupts
चाकूर : तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सर्वत्र दाणादाण झालेले पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे तालुक्यातील नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे अनेक गावांत पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चाकूर तालुक्यात चांगलाच पावसाचा जोर वाढला असून चाकूर शहरात मुख्य रस्त्यावर कमरेला पाणी आल्याने ते पाणी वाहून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. आजूबाजूच्या खेडेगावातून चाकूर शहरात येणाऱ्यांचा नद्या, नाल्यांना पूर आल्यामुळे संपर्क तुटला आहे. शेळगाव येथील तिरू नदी दुथडी भरून वाहत आहेत. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसात बाहेर कोणी येऊ नये, काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चाकूर आटोळा रस्त्यावर पाणी आल्याने रेल्वे पुल पाण्यात गेल्यामुळे त्या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील कैलास टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात, रानात पाणी शिरले आहे, अख्खे पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाने सांडोळ पाझर तलाव क्रमांक १ या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे तलावाचे पाणी सांडव्यावाटे काढून देण्यात आलेले आहे. घरणी नळेगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.