Heat stress cattle health : उष्णतेचा गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

जनावरांची विशेष काळजी घ्या : डॉ. अनिल भिकाने यांचे आवाहन
Heat stress cattle health
उष्णतेचा गुरांच्या आरोग्यावर विपरीत परिणामpudhari photo
Published on
Updated on

उदगीर : सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. गाई-म्हशींमध्येही उष्णतेचा ताण (हीट स्ट्रेस) झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्य, दूध उत्पादन आणि प्रजननक्षमतेवर होत असल्याने पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला पशुतज्ज्ञ तथा माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी दिला आहे.

डॉ. भिकाने यांनी सांगितले की, विशेषतः म्हशींना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होतो. काळी कातडी आणि कमी घामग्रंथी असल्यामुळे म्हशींना गाईंपेक्षा उष्णता सहन करणे अधिक कठीण जाते. त्याचप्रमाणे संकरित गाईंच्या त्वचेतही घामग्रंथी कमी असल्याने त्या देखील उष्णतेच्या ताणास लवकर बळी पडतात.उष्णतेच्या ताणामुळे जनावरांच्या वर्तनात आणि आरोग्यात स्पष्ट बदल दिसून येतात.

Heat stress cattle health
Kumbh Hydropower Project : कुंभे जलविद्युत प्रकल्पाच्या आश्वासनांचा प्रवाह आटला

जनावरे चारा कमी खातात, पाणी अधिक पितात, धापा टाकतात, तोंडातून लाळ गळते, सुस्त होतात आणि दूध उत्पादनात घट दिसून येते. काही वेळा दुभत्या जनावरांचे दूध प्रतिदिन एक ते दोन लिटरपर्यंत कमी होते.काही जनावरांत अपचन होते बद्धकोष्टता होते किंवा हगवण लागते. उष्णतेचा परिणाम प्रजननक्षमतेवरही होतो. माज न येणे, मुका माज येणे, गर्भधारणेचे प्रमाण घटणे आणि पुनरावृत्ती माज वाढणे अशा समस्या निर्माण होतात.

या दुष्परिणामांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या पण अत्यंत प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जनावरांना थेट उन्हात बांधू नये. सकाळी 10 ते सांयकाळी 5 मोकळे सोडू नये . गोठ्यात पुरेशी सावली, खेळती हवा आणि उष्णता कमी शोषणारे छत असावे. पत्र्याच्या छतावर गवत, गोणपाट किंवा शेडनेट टाकल्यास उष्णता कमी होते. छतावर पांढरा चुना मारल्यास गोठ्यातील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.

शेडमध्ये जनावरे दाटीवाटीने ठेवू नयेत. जनावरांना दिवसभर मुबलक स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. पाण्यात बर्फ टाकल्यास जनावरे पाणी अधिक आवडीने पितात. पाण्याचा हौद सावलीत ठेवावा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी गाईम्हशीवर दोन तिन वेळा पाण्याचा शिडकावा करावा. गोठ्यात फॉगर्स व्यवस्था केल्यास उष्णतेचा ताण लक्षणीयरीत्या कमी करता येतो.उन्हाळ्यात आहार व्यवस्थापनातही बदल करणे आवश्यक आहे.

Heat stress cattle health
Wild animals damage crops : जंगली प्राण्यांचा भात व कडधान्यांच्या शेतात धुडगूस

सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा चारा द्यावा. दुपारच्या वेळी हिरवा, ताजा व पचायला हलका चारा द्यावा. संतुलित पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, गूळ, मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स दिल्यास निर्जलीकरण कमी होऊन जनावरांची उत्पादनक्षमता टिकून राहण्यास मदत होते.दुपारच्या कडक उन्हात जनावरांची वाहतूक टाळावी.सावली, थंड पाणी, फॉगर, हवेशीर गोठा आणि संतुलित आहार या साध्या शास्त्रीय उपायांनी उष्णतेच्या ताणामुळे होणारे आरोग्याचे व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. योग्य उन्हाळी व्यवस्थापन केल्यास गाई-म्हशी निरोगी राहून दूध उत्पादनही टिकून राहते, असे डॉ. अनिल भिकाने यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news