

Groundwater level has decreased in Renapur taluka; Groundwater system report
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुका नेहमीच टंचाईच्या छायेत राहिला आहे. या वर्षी तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याने विहिरी बोअरनी तळ गाठला होता, तर रेणा, व्हटी या प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली. पाझर तलाव कोरडे पडले होते, बॅरेजेसमध्येही जेमतेम पाणी राहिले. त्यामुळे तालुक्याची भूजल पातळी खालावत गेली. त्याचा परिणामी म्हणून आजही तांडे वाड्यातील सर्वसामान्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
तालुक्यातील कांही गावांची भूजल पातळी खालावली असून पाच सहा वर्षांच्या तुलनेत ती २.६५ इतकी झाल्याचा गेल्या मार्च महिन्यातील भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अहवाल सांगतो. यावर उपाय म्हणून तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी गावागावात भूजल पुनर्भरण मोहीम हाती घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम सक्षमपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेणापूर तालुक्यात आजही तांड्या वाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. हनमंतवाडी तांड्यावरील नागरिकांना उन्हाळा असो की पावसाळा नेहमीच पिण्याचे व सांडपाणी विकतच घ्यावे लागते. भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार रेणापूर तालुक्यातील कांही गावे अतिशोषित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ज्या गावांची भूजल पातळी खालावली आहे.
अशा गावांचा भूजल विभागाने अटल भूजल योजनेत सामावेश केला आहे. या अतिश विभागाच्या ोषीत गावात जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीतील पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याचे काम भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातुन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
लहान लहान ओढे, नाले, पाणी साठून राहणारी ठिकाणे व ज्या ठिकाणाहून पाणी वाहून जाते अशा ठिकाणी प्राधान्याने पुनर्भरण करावे लागणार आहे. शिवाय ज्या शेतातील पावसाचे पाणी नाल्या ओढ्याला वाहून जाते अशा ठिकाणीही पाणी अडवून ते जमिनीत कसे मुरविता येईल. यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. पावसाळा तोंडावर आला आहे. तेंव्हा बोअरचे पुनर्भरण करण्यासाठी बोअरच्या बाजूने २ बाय २ या आकाराचा खड्डा तयार करून त्यात कात्या, मोठे दगड, गोठे, कच, गट्टी व खडी टाकून पावसाचे पाणी जमिनीत मुरविले तर बोअरच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
प्रत्येक गावात सार्वजनिक व वैयक्तिक हातपंप, बोअर आहेत. उन्हाळ्यात बहुतांश ते पाण्याविना कोरडे पडतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पावसाळ्यात घरांच्या छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्भरण केले तर भूजल पाणी पातळी वाढून कांही अंशी पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने व रेणा-पूरच्या नगरपंचायतीने पुढाकार घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम हाती घेण्याची गरज आहे.