

लातूर, पुढारी वृतसेवा: लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना मुंबई येथील कोकीलाबेन रुग्णालयात एअर अॅम्बुलन्सद्वारे सोमवारी (दि.७) हलवण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने अद्ययावत उपचाराची गरज होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले. सह्याद्री हॉस्पिटल ते लातूर विमानतळ असा ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला होता. मुंबईतही विमानतळ ते कोकीलाबेन रुग्णालय असा ग्रीन कॉरिडोर असेल. (Latur Babasaheb Manohare )
मनोहरे यांनी येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या शासकीय बंगल्यात शनिवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात रिव्हॉलव्हरने गोळी झाडली होती. त्यांना सह्याद्री हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली होती. मेंदुच्या काही भागाला व आवरणाला इजा झाली होती. कवटीच्या हाडांचे तुकडे मेंदूत पसरल्याने रविवारी पहाटे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
तथापि, त्यांच्या डाव्या हाता- पायाची ताकद कमी झाली आहे. हालचाल अतिशय मंद व समाधानकराक नाही. पक्षाघाताची शक्यता असल्याने त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार होणे गरजेचे होते. तशा अद्ययावत सुविधा मुंबई, पुणे येथे आहेत. मनोहरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेण्याचे सांगितल्याने त्यांना एअर अॅम्बुलन्सद्वारे लातुरहून हलविण्यात आले आहे.