

Gates of Dhanegaon barrage opened in Devani taluka
सतीश बिरादार
देवणी : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आहेत. शिवाय पिकात पाणी असल्याने पिकांची नासाडी झाली आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण पाण्यात बुडाले... शासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात आजतागायत ३०० मिमी सरासरी पावसाची नोंद शासन दप्तरी नोंदवली गेली आहे. गुरुवारी रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे तर शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने देवणी मंडळात २१ मिमी, बोरोळ मंडळात ३० मिमी तर वलांडी मंडळांत १० मिमी पावसाची नोंद शनिवारी नोंदवली गेली.
शिवाय धनेगाव बॅरेज बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडले आहेत. १२० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला असल्याची माहिती शाखा अभियंता दत्ता कोल्हे यांनी दिली. गुरुवारी झालेला दमदार पाऊस, गिरकचाळ येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ बांधण्यात आलेला मुरुमाचा बांध फुटला असल्याने पाण्याचा येवा वाढला वाढलेले पाणी नदीपात्राबाहेर पसरल्याने शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.
नदीकाठच्या हेळंब, धनेगाव, टाकळी, लासोना, विजयनगर, बटनपूर, बोरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, शिऊर हंचनाळ, नदीकाठी, चिचोंडी, होसुर या गावच्या शेतातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
शिवाय नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. शनिवारी देवणी प्रशासनाकडून गट विकास अधिकारी ज्ञानोबा मुळे, कनिष्ठ सहायक दिलीप कांबळे. संतोष शिरापुरे सपोउपनि वऱ्हाडे यांनी धनेगाव बॅरेजला भेट देऊन पूर परिस्थितीची पहाणी करून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.