

केज (लातूर) : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण पारंपरिक पद्धतीने, शांततेत आणि उत्साहात पार पडावेत यासाठी केज पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी स्पष्ट केले की, मिरवणुकांसाठी डीजेला अजिबात परवानगी नाही. ५५ डिसिबलपेक्षा जास्त आवाजाचे वाद्य वाजविल्यास कठोर कारवाई केली जाईल.
डीजे आणि दारुड्यांमुळे मिरवणुकीला गालबोट लागते. त्यामुळे पारंपरिक वाद्ये, भक्तीपर गीते, लेझीम पथके, पोवाडे यांचा वापर करा. अश्लील गाणी, द्वेष निर्माण करणारी गाणी किंवा भडक भाषणे वाजविल्यास कायदेशीर कारवाई होईल. एकमेकांना सहकार्य करून सण साजरा करा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस तहसीलदार राकेश गिड्डे, मुख्याधिकारी अजित ढोपे, राष्ट्रवादीचे नेते हारून इनामदार, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एम.जी. सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, फौजदार सुकुमार बनसोडे, डीएसबीचे शिवाजी कागदे आदी उपस्थित होते.
तहसीलदार राकेश गिड्डे म्हणाले, सण साजरे करताना कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त केले जातील. स्टेज उभारताना वाहतुकीस अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या. उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या मंडळांना राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर बक्षिसे मिळतील. कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी खड्डे व कच्चे रस्ते मुरुम टाकून भरून घेण्याचे आश्वासन दिले. महावितरणशी समन्वय ठेवून वीज समस्या सोडवली जाईल तसेच विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.
हारून इनामदार यांनी नगरपंचायतीतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये व तृतीय २००१ रुपयांची पारितोषिके देण्यात येतील, असे जाहीर केले. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले, तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी मानले.