

शहाजी पवार, लातूर
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी-गणपती. गावगाड्यातील प्रत्येक सण-उत्सव परंपरेच्या धाग्यांनी जोडलेला असतो. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौराई देखील घरी येतात. घराघरांत आनंद, ऐश्वर्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा हा सण स्त्रियांच्या मनाशी घट्ट जोडलेला आहे. सोन्यासारख्या पिवळ्या साड्यांमध्ये सजलेल्या, डोक्यावर फुलांचा गजरा मिरवणाऱ्या आणि तेजस्वी मुखवट्यांनी उजळलेल्या गौरी म्हणजे खऱ्या अर्थाने समृद्धीचे प्रतीक.
या उत्सवाचे खरे वैभव असते ते गौरीचे मुखवटे. कधी काळी बलुतेदारांचा मान असलेली व अगदी पानसुपारीवर घरोघर पोहोचवली जाणारी ही कला आज आधुनिक रूप धारण करून व्यवसायाचा मजबूत पाया बनली आहे. गौरीच्या मुखवट्यांचा आणि प्रतिष्ठापनेच्या पद्धतींचा हा प्रवास खरोखरच रंजक आहे.
पूर्वीच्या गावगाड्यात बारा बलुतेदारांमध्ये कुंभाराला विशेष मानाचे स्थान होते. गौरी-गणपतीचे मुखवटे घरोघर पोहोचवणे ही त्याची जबाबदारी असे. बदल्यात त्याला मानाची सुपारी, गूळ-खोबरे मिळे. या छोट्याशा मोबदल्यातही कुंभार समाधानी असे, कारण ही जबाबदारी म्हणजे सन्मान मानला जाई. गाईच्या शेणाचा गोल उंडा करून त्याला आकार देताच त्यातून गौरीचा चेहरा साकारला जाई. उन्हात वाळवून तो मुखवटा अधिक टिकाऊ बनवला जाई. पुढे भाजलेल्या मडक्यावर हळदी-कुंकवाने नाक, डोळे रेखाटले जात. या मुखवट्यांमध्ये सौंदर्यशास्त्रापेक्षा भक्तिभाव जास्त होता.
कालांतराने लोकांच्या नजरेत सौंदर्यालाही स्थान मिळाले. साधे-सरळ मुखवटे हळूहळू आखीवरेखीव होऊ लागले. कुंभाराने मडक्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिखलातून सुरेख चेहरे बनवायला सुरुवात केली. भाजून, रंगवून त्यांना देखणे रूप मिळाले. नाक, डोळे, कान, केशरचना यांत तपशीलवार सौंदर्य भरले गेले. हीच पुढील काळातील शाडूच्या मुखवट्यांची पायाभरणी ठरली.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बलुतेदारी व्यवस्थेला उतरती कळा लागली, पण या कलेचा वारसा मात्र थांबला नाही. नव्या मूर्तिकारांनी पारंपरिक कलेला आधुनिक व्यवसायाचे अधिष्ठान दिले. 1964 नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे बाजारात आले. त्यातून कॉर्पोरेट लूक असलेले गौरीचे मुखवटे लोकप्रिय झाले. आज तर फायबरच्या मुखवट्यांचीही भर पडली आहे, जे टिकाऊ व आकर्षक असल्याने मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात.
पूर्वी गौरी उभारण्यासाठी पेरणीच्या बांबूच्या नळ्या वापरल्या जात. त्या जमिनीत रोवून त्यावर साड्या गुंडाळल्या जात व मुखवटा अग्रभागी बसवला जाई. ही प्रक्रिया तासन्तास चालायची. पुढच्या काळात नवीन कल्पना साकारली गेली. यात धान्याने भरलेल्या मडक्यांची उतरंड उभारून त्यावर मुखवटे बसवले जाऊ लागले. उतरंडीच्या तळाशी चिकनमातीचे अळे असायचे. याच काळात प्रतिष्ठितांच्या घरी भांड्यांच्या उतरंडीचाही वापर होऊ लागला. या पद्धतीमागे अनुभवातून आलेले शहाणपण व शास्त्र असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मडक्यातील धान्यामुळे उतरंड स्थिर राहायची, त्यामुळे गौरी कोसळण्याचा धोका नसायचा. पुढे लोखंडी पट्ट्यांपासून मानवी शरीराच्या आकारातील साचे आले. आज तर सजलेल्या देखण्या रेडिमेड गौरीही बाजारात उपलब्ध आहेत.
गौरी मुखवट्यांचा प्रवास हा साध्या भक्तिभावापासून सुरेख सौंदर्यापर्यंत आणि तेथून व्यावसायिकतेपर्यंत पोहोचलेला आहे. कलेच्या या प्रवासात गावगाड्याचे वैभव दडलेले आहे. आज जरी फायबरच्या, रंगीबेरंगी रेडिमेड गौरी सहज मिळत असल्या तरी त्यांच्या मागे बलुतेदारांचा इतिहास, परंपरेचा ठेवा आणि शतकानुशतकांची संस्कृती दडलेली आहे.