लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी सराईत व सवयीच्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम राबविली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एका वर्षात २७ प्रकरणांमध्ये ३८ आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यात आरोपींवर वेळेत आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोपींना अटक, जामिनावरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, बंधपत्राचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कार्यवाही तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत ४ प्रकरणांतील १५ आरोपी, कलम ५६ अंतर्गत १३ प्रकरणांतील १३ आरोपी आणि कलम ५७ अंतर्गत १० प्रकरणांतील १० आरोपी अशा एकूण ३८ जणांना हद्दपान करण्यात आले आहे.
याशिवाय अनेक सराईत आरोपींविरुद्ध हद्दपारीचे प्रस्तावही प्रक्रियेत आहेत. सराईत आरोपींकडून पुन्हा गुन्हे घडू नयेत, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने प्रत्येक पात्र आरोपीवन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर विशेष भर दिला जात आहे. पुढील काळातही सराईत गुन्हेगार, टोळ्या आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशी-कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार लातूर जिल्हा पोलिस दलाने व्यक्त केला आहे.