

Even after 22 months, the construction of the ZP girls' school has not been completed.
संग्राम वाघमारे
चाकूर : येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे बांधकाम २२ महिने उलटूनही अपूर्ण स्थितीत असल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवीन इमारतीमध्ये मुलींना शिक्षण मिळेल का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कन्या शाळेच्या बांधकामाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून याला अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. जि. प. कन्या शाळेची स्थापना १९४१ ला झाली आहे. शाळा जीर्ण झाल्याने जुलै २०२२ ला शासनाच्या राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता अभियानांतर्गत नवीन इमारत बांधकामासाठी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
शाळेचे बांधकाम जानेवारी २०२४ मध्ये प्रत्यक्ष सुरू झाले. कंत्राटदराने शाळा बांधकाम १५ जून २०२४ पर्यंत शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार आणि यंत्रणेच्या अभावामुळे कामाला गती मिळण्याऐवजी धिम्या गतीने काम केल्याचा फटका बसला आहे. आजपर्यंत काम पूर्ण होऊन विद्यार्थिनींना नव्या इमारतीमध्ये शिक्षण घेणे सुलभ झाले असते मात्र सद्यस्थितीत पहिला मजला तयार झाला आहे. दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे.
कॉलम उभा केले असून वीट बांधकाम कधी करेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे. खालच्या मजल्यावरील वर्गखोल्यांना अद्याप गिलावा केला नाही. दुसऱ्या वर्षाच्या २०२५ शैक्षणिक वर्षातही हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते काम पूर्ण होऊ शकले नाही. याला जबाबदार कोण असा सवाल पालक व नागरिकांनी विचारला आहे.
शाळेचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्याने समग्र शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंतानी कंत्राटदाराला ३० जून २०२४ पर्यंत पहिला मजला विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आणि लेखी पत्र देवून प्रतिदिवस दंड लावण्यात येईल असे कळवले होते. परंतु कंत्राटदाराने यापूर्वीही कार्यकारी अभियंता यांच्या पत्रालाही न जुमानता कामात प्रगती केली नाही. यामुळे जिल्हा परिषद कन्या शाळेचे भवितव्य सध्यातरी अंधारात असून त्याचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २२ महिने उलटूनही या शाळेचे बांधकाम पूर्ण होईल असे वाटतं नाही, याला शासकीय यंत्रणा आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची चर्चा पालक आणि नागरिक करीत आहेत.
शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन विद्यार्थिनी कधी नव्या इमारतीत ज्ञानाचे धडे घेतील हे न बोललेलेच बरे. दरम्यान जि. प. शिक्षण विभागाशी संपर्क केला असता, वारंवार निधीची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे या बांधकामास विलंब होत असल्याचे सांगितले.