

केज, (लातूर) गौतम बचुटे
पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नवीन प्रयोग करण्याची हिंमत जरी कमी शेतकऱ्यांमध्ये दिसत असली तरी केज तालुक्यातील साळेगावच्या दत्ता इंगळे या तरुण शेतकऱ्याने ही जोखीम घेतली आणि केवळ साठ दिवसांत दोन एकरांमधून तब्बल पाच लाखांचे उत्पन्न कमवत सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे दत्ता इंगळे यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पीकपद्धतीला विराम देत फुलकोबी लागवडीचा प्रयोग हाती घेतला. बाज-ारातील वाढती मागणी पाहता त्यांनी उत्तम प्रतीच्या वाणाची रोपे नर्सरीतून मागवून दोन एकर क्षेत्रात नियोजनबद्ध लागवड केली. फुलकोबीसाठी वेळेवर पाणी व्यवस्थापन, खतांचा अचूक वापर आणि तांत्रिक पद्धतीने फवारणी असे सर्व उपाय त्यांनी काटेकोरपणे राबवले. परिणामी अवघ्या दोन महिन्यांत कोबी विक्रीयोग्य आकाराला आला.
प्रत्येकी १ ते १.५ किलो वजनाची फळे मिळत असून एकरी सुमारे पाच टन, तर दोन एकरांमधून दहा टनांपेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. काढणीला सुरुवात होताच दत्ता इंगळे यांनी कोबीची थेट हैदराबाद बाजारात पाठवणी केली. तेथे प्रति क्विंटल सुमारे ५,००० रुपये असा आकर्षक दर मिळत आहे. आतापर्यंत रोपे, फवारणी, खते, मशागत आणि तयारी यासाठी साधारण एक लाख रुपयांचा खर्च आला असून, अंतिम हिशोबात पाच लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा अपेक्षित आहे. दत्ता इंगळे यांच्यासारखे अनेक तरुण शेतकरी आज पारंपरिक पिकांपलीकडे पाहून शेतीला एक उद्योग म्हणून स्वीकारत आहेत. कमी कालावधीत आणि योग्य नियोजनाने फुलकोबीसारखी भाजीपाला पिके चांगला परतावा देऊ शकतात, हे दत्ता इंगळे यांनी सिद्ध केले आहे. दोन वर्षांपूर्वी इंगळे यांनी शेतात हळदीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले होते. मात्र त्यावेळी बाजारभाव घसरल्यामुळे अपेक्षित नफा मिळ शकला नाही. त्या अनुभवातून शिकून त्यांनी बाजाराचा अभ्यास केला आणि अल्पकालीन परतावा देणाऱ्या फुलकोबी सारख्या पिकाचा पर्याय निवडला. आज त्यांचे निर्णय घेण्याचे धाडस आणि नियोजन त्यांना यशाची गोड फळे देत आहे. पारंपरिक पिकांमध्ये दरवेळी नफा मिळतोच असं नसतं. म्हणूनच मी ठरवलं की बाज-ारात कोणत्या पिकाला मागणी आहे ते पाहूया आणि त्यानुसार नियोजन करूया. फुलकोबी पिकासाठी वेळेवर पाणी, खते आणि योग्य वाण घेतलं तर केवळ दोन महिन्यांत चांगला परतावा मिळतो. शेतीत आधुनिक पद्धती स्वीकारल्या तर शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असे दत्ता इंगळे यांनी सांगितले.
योग्य नियोजन, योग्य वाण आणि थेट बाजारपेठ - आधुनिक शेतीचा मंत्र
दत्ता इंगळे यांची ही यशोगाथा केवळ एकाच शेतकऱ्यापुरती मर्यादित नाही; ती आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी दिशादर्शन आहे. कमी काळात, कमी खर्चात आणि अधिक नफा मिळवून देणारी आधुनिक पिके घेण्यासाठी दत्ता इंगळे यांनी दाखवलेला मार्ग निश्चितच आदर्श ठरतो.