

Elder brother remanded in police custody for five days in murder case
शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील थेरगाव येथे रागाच्या भरात मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मोठ्या भावाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी माधव सूर्यवंशी (वय ५६) हे पुणे येथे वास्तव्यास होते. मात्र, दीपावलीच्या सणानिमित्त ते आपल्या मूळगावी थेरगाव येथे आले होते. मंगळवारी सकाळी किरकोळ कारणावरून त्यांचा मोठा भाऊ तानाजी माधव सूर्यवंशी यांच्याशी वाद झाला.
वाद वाढत जाऊन तानाजी सूर्यवंशी यांनी काठीने धनाजी सूर्यवंशी यांच्या डोक्यात जोरदार फटका मारला. या मारामुळे धनाजी सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्र. २३३/२०२५ नुसार कलम १०३(१), ११५(२), ३५२ भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी आरोपी तानाजी सूर्यवंशी यांना निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश रायबोळे करीत आहेत.