

Drought Announcement Maharashtra
औसा : पावसाने पाठ फिरवल्याने करपलेली सोयाबीनची पिके, आटलेल्या विहिरी आणि नदी-नाल्यांची दयनीय अवस्था पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.२३) औसा तालुक्यातील खरोसा येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ‘येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान सरसकट झाले आहे. त्यामुळे मदतही सरसकटच केली जाईल,’ अशी घोषणा त्यांनी केली. रब्बी पिकांसाठीही मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
लातूर व धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज औसा तालुक्यातील खरोसा येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी हातात करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या घेऊन आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पिकाला दाणाच भरला नसल्याचे दाखवत पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंचनामे कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. ‘पंचनामे कायद्यानुसार करावे लागतात; मात्र तुमचे नुकसान सरसकट झाल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे मदतही सरसकटच करू,’ असे त्यांनी सांगितले.
‘१९७२ नंतर इतका मोठा दुष्काळ पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात केवळ सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र चिंता करू नका, सरकार तुमच्यासोबत आहे,’ असा धीर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अन्नधान्य आणि आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंधारणाची कामे तसेच रोजगारनिर्मितीची कामेही हाती घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेता आली, तर त्यासाठीही मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दुष्काळाच्या काळात सर्वाधिक गंभीर होणारा पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांवर काम सुरू असून, कोल्हापूर आणि सांगलीकडील पाणी आणण्याच्या उपाययोजनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.
‘कर्जमाफीचे काम सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. कर्जमाफीचे पैसे दिले जातील. दुष्काळाचे पैसेही लवकरात लवकर खात्यात टाकू,’ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या संकटात शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा पाच खेडी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. वीजबिलाच्या थकबाकीमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना शासनाच्या माध्यमातून बिल भरून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. ‘या संकटात सरकार संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार दिनकर माने यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.